पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयटीआय मोरवाडी येथील विद्यार्थ्यांनी बारावी समकक्षता परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच जाहीर केलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालात संस्थेचा एकूण निकाल ८४.५१ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या ७१ विद्यार्थ्यांपैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शासनाने आयटीआयमधील व्यवसाय अभ्यासक्रमांना इयत्ता बारावीची समकक्षता दिली असून त्यासाठी मराठी व इंग्रजी हे विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे. संस्थेतील ऋषिकेश आंबावले (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ८१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक कुमकर (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ७८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर निशित सुरवसे (मोटार मेकॅनिकल ट्रेड) याने ७४.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या यशामागे निदेशक अमोल शिंदे तसेच गटनिदेशक (सेवानिवृत्त) राजकुमार तिकोणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेमार्फत निदेशक विक्रम काळोखे, मुख्य लिपिक विजय भैलुमे आणि लिपिक विजय चावरिया यांनी संपूर्ण कामकाजाची जबाबदारी सांभाळली.

प्राचार्य शशिकांत पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षिसे दिली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत अधिक मेहनतीने प्रगती करण्याचे आवाहन केले.




















Join Our Whatsapp Group