पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, स्वाभिमान, शिक्षण, सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने महासदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.

शिवशाही प्रतिष्ठान हे १८ पगड जाती, १२ बलुतेदार समाज तसेच सर्व धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्रित घेऊन सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने कार्यरत आहे. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान सातत्याने जनसेवा करत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गर्जना मदत उपक्रम, गड-किल्ले संवर्धन, गोरगरीबांना मदत, समाजसेवा, शिवकालीन इतिहास व संस्कृतीचा अभ्यास तसेच युवकांमध्ये शिवस्मृती जागवण्याचे कार्य राबविले जाते.

यावेळी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अथर्व तावरे यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत शिव-शंभू-शाहू-फुले-आंबेडकर-साठे यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य शिवशाही प्रतिष्ठान करत आहे. महासदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक युवक व नागरिकांना या विचारांशी जोडून एक सशक्त आणि संघटित समाज निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

महासदस्य नोंदणी अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरून प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी :
🔹 पिंपरी-चिंचवड शहर महासदस्य नोंदणी फॉर्म :
https://docs.google.com/forms/d/1j1Y8UQg3JRrDTZLcM58bEXC-IFaeVDxALbpUxmsDlAI/viewform




















Join Our Whatsapp Group