जेजुरी (Pclive7.com):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला असताना एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ एका दिंडीच्या ट्रकने सात वारकरी महिलांना भीषण धडक दिली. या दुर्दैवी अपघातात तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत. पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामी आल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

दिंडीच्या ट्रकनेच दिली धडक..
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या ‘रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडी’ मधील ट्रकने सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ असलेल्या साईदीप लॉजच्या बाजूला या वारकरी महिलांना जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत सातही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.

बचावकार्य आणि पोलीस तपास
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उर्वरित चार महिलांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघात करणाऱ्या दिंडीच्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group