पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनलगत कॅस्टालिया सोसायटी समोरील मोकळ्या जागेत खुलेआम मद्यपान सुरू असून या ठिकाणी मद्यपींचा अड्डा निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस व महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात मद्यपी जमा होत असून खुलेआम मद्यपान केले जाते. परिसरात अनेक उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्या असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मद्यपींच्या या अड्ड्यावर अनेकदा वादविवाद, भांडणे, आरडाओरड आणि शिवीगाळ होत असल्याने परिसरातील शांतता भंग होत आहे. विशेष म्हणजे शेजारील लिनियर गार्डनमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी येत असतात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी पोलीस प्रशासनाने या बेकायदा मद्यपानाच्या अड्ड्यावर कठोर कारवाई करावी तसेच महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि नियमित गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group