पिंपरी (Pclive7.com):- देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान मोेठे आहे. मात्र ही युवा पिढी जर व्यसनांच्या अधीन झाली तर ती ते देशाचाच काय, पण स्वतःचाही विकास करण्यात सक्षम असणार नाही.आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तरुण वयात जडलेल्या व्यसनाचे दूरगामी परिणाम शरीरावर होत असतात. यामुळे तरुणांनी व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवावे. तरुणांना व्यसनापासून दूर करण्याकरिता एकविरा सेवा संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. असे प्रतिपादन उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी केले.
वाल्हेकरवाडी येथील एकविरा सेवा संघ ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नववर्ष स्वागतासाठी आयोजित वाल्हेकरवाडी ते कार्ला एकविरा देवी पालखी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी केले. या वेळी पालखीचे पूजन ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका संगीता भोंडवे, सुरेश भोईर, स्विकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, हेमंत ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाल्हेकरवाडीतील एकविरा सेवा संघाच्या वतीने सरत्या वर्षाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप देण्या करिता प्रत्येक वर्षी संस्थापक अध्यक्ष सुधीर आबा वाल्हेकर आणि महिला प्रदेश अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी वाल्हेकरवाडी ते कार्ला देवी पर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन मागील बारा वर्षांपासून करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी या सोहळ्यात तरुणांचा सहभाग वाढत चालला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये आनंद लुटतात. काही जण गाण्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत चित्रविचित्र अंगविक्षेप करताना नाचतात. काही जण घरातच टीव्हीसमोर बसून कार्यक्रम पाहून समाधान मानतात, तर काहीजण सहलीला जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. या सर्वांना फाटा देऊन महिला,तरुण,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आदी जवळपास ६०० नागरिकांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी शिवाजी आवारे, विनोद राठोड, बिरुमल चोबे, विशाल मोहिते, गणेश गिरी, महेश ढाकोळ, राजू सोनार,संतोष सोरटे, उत्तरेश्वर शिंदे, संतोष पवार, हर्षवर्धन कुऱ्हाडे, संतोष तिकोणे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अध्यक्ष आबा वाल्हेकर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group