पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “एक दिवस शाळेसाठी” या जनजागृती उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, वाहतूक नियम, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

वाहतूक शाखेमार्फत १६ जुलै रोजी ३१ व्या टप्प्यात १५ टीममधील १२ अधिकारी व १८ अंमलदार यांनी शहरातील १४ शाळांना भेट देऊन सुमारे १,८३५ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ३१ टप्प्यांमध्ये ५०२ शाळांमधील तब्बल १ लाख १३ हजार १७१ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून वाहतूक आणि नागरी जबाबदाऱ्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिक घडविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त किशोर देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group