पिंपरी (Pclive7.com):- बिजलीनगर येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून चार जणांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सरसेनापती बिपीन रावत भुयारी मार्गाशेजारी, नागसेननगर झोपडपट्टी परिसर, बिजली नगर, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारून मुंबई व कल्याण नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या कारवाईत सचिन ज्ञानोबा काळे (वय २५, चाफेकर चौक वेताळ नगर), महेश रमेश शहा (वय ४८, गुरुनानक कॉलनी, रहाटणी), शंकर सदाशिव मिसाळ (वय ३९, गुरुद्वारा चौक बिजलीनगर) आणि एक अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यादरम्यान पोलिसांनी जुगाराच्या साहित्यांसह रोख रक्कम असा एकूण ३२ हजार ३१० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शिवराम भोपे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायांवर कारवाईची मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.





















Join Our Whatsapp Group