पिंपरी (Pclive7.com):- नीट परीक्षा घोटाळ्यातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 18) ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.

अपना वतन संघटना आणि शहरातील विविध समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, अंनिसच्या रोहिणी कांबळे, मूलनिवासी संघटनेचे अंजुम इनामदार, समाजवादी पार्टीचे रवी यादव, राजन नायर, ब्रह्मानंद जाधव, प्रदीप पवार, गणेश दराडे, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख, फेरोज तांबोळी, पँथर सेनेचे राजू सरोदे, प्रकाश घोडके, प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान मानव कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सोनम वांगचुक हे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांना पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून अन्यायकारक व चुकीच्या धोरणांना विरोध करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

आयोजक सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले की, लद्दाखमधील शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी सोनम वांगचुक यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. सध्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ते उपोषण करत आहेत. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी जितेंद्र जुनेजा, राजश्री शिरवळकर, गणेश जगताप, चांद सय्यद, तौफिक पठाण, हाजीमलंग शेख, शौकत शेख, सोमनाथ देवकर, अल्ताफ शेख, अकील सय्यद, मारुती वेताळ, गंगाराम वेताळ, वैभव जाधव, मोहम्मद अजीज, अनिल कारेकर, विजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने नीट परीक्षा प्रकरणातील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group