पिंपरी (Pclive7.com):- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आणि संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. दोषींना तातडीने कठोर शिक्षा देण्यात यावी, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन निषेध व्यक्त केला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड मान्य नाही”, “पेपरफुटीतील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. देशभरातील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधूनही ठाम पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पाठिंबा मिळत असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.




















Join Our Whatsapp Group