पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौकात ‘न्याय विजय’ साजरा करण्यात आला. नीट-सीबीएसई परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॅन्डल मार्चचे रूपांतर विजय मार्चमध्ये झाले. कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आनंद व्यक्त केला.

काँग्रेसच्या वतीने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, पेपरफुटी प्रकरणाची संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी याला विद्यार्थी चळवळीचा आणि न्यायाचा विजय असल्याचे म्हटले.

यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांवर आणि परीक्षा व्यवस्थेवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच युवकांनी सामाजिक आणि लोकशाही चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “हा न्याय विजय देशभरातील आंदोलक विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला समर्पित आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश मिळाल्याचा हा क्षण आहे.”

कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, प्रदेश क्रीडा विभागाच्या अध्यक्षा समिता गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स्वप्नील बनसोडे, राहुल शिंपले, गौतम आरकडे, पांडुरंग जगताप, शहाबुद्दीन शेख, स्वाती शिंदे, करण गील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ‘न्याय विजय’ अशी अक्षरे मेणबत्त्यांद्वारे प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आणि संविधान व लोकशाही मूल्यांच्या समर्थनाचा संदेश दिला.




















Join Our Whatsapp Group