भोसरी (Pclive7.com):- कंपनीत पत्रे बदलण्याचे काम करत असताना छतावरून खाली पडून मोहम्मद सय्यद शौहराब (वय २६) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामादरम्यान झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम उद्योग, जे-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथील कंपनीत २१ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र चंद्रकांत पाचर्णे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी समीर विजयकुमार भट (वय ५३, रा. धनकवडी, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करणारे मोहम्मद सय्यद शौहराब हे पत्रे बदलण्याचे काम करत असताना छतावरून खाली लोखंडी पाईपवर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न करता त्यांच्याकडून काम करून घेतल्याचा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका कंपनी व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.




















Join Our Whatsapp Group