पिंपरी (Pclive7.com):- आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्राध्यापक दीपक जाधव आणि प्राध्यापिका वैशाली गायकवाड यांनी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवत निराधार व बेघर नागरिकांसाठी फराळ आणि फळांचे वाटप केले. त्यांच्या पुढाकारातून प्रिस्टीन फॉस्फेरा सोसायटीतील रहिवाशांना एकत्र आणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

सोसायटीच्या सभासदांच्या सहकार्याने पिंपरी येथील सावली निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या निराधार नागरिकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळाचे पदार्थ तसेच फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे निवारा केंद्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी विटुगेदर फाउंडेशनचे सलीम सर, जावेद कुलकर्णी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश वाघमारे, विलास बावळ, मेघराज हजारे, राहुल इंगळे, जयस्वाल, योगेश खिळे, सोनाली चौधरी आणि प्रणिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा सामाजिक उपक्रमांची गरज व्यक्त केली.




















Join Our Whatsapp Group