नगरसेविका स्नेहा कलाटे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढता नागरी विस्तार आणि भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेता पिंपरी-चिंचवडसाठी दीर्घकालीन व शाश्वत पाणी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.

निवेदनात रावेत येथील विद्यमान पंप हाऊस प्रकल्पाच्या धर्तीवर शहरासाठी आणखी एक आधुनिक पाणी उपसा प्रकल्प, पंपिंग स्टेशन आणि आवश्यक जलवाहिनी व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नवीन पाणी स्रोतांचा शोध घेण्याची आणि त्याचे नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

तसेच शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, तो तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक प्रक्रिया वेगाने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पाणीगळती मोठ्या प्रमाणात कमी होईल, पवना धरणातील उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल आणि शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन सुरक्षितता मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

याशिवाय महानगरपालिकेने शहराच्या पुढील २५ वर्षांच्या पाणी गरजांचा सर्वंकष आराखडा तयार करून वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि नागरीकरण लक्षात घेऊन नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. शहराच्या भविष्यातील पाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group