पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या ट्रॅव्हल्स बसेसवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहरात त्यांच्या वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी युवासेनेचे उपशहरप्रमुख कुणाल जगनाडे यांनी पोलीस आयुक्त आणि महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जगनाडे यांच्या निवेदनानुसार, वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच ट्रॅव्हल्स बसेस विनानियोजन आणि विनापरवानगी शहरातील प्रमुख चौक, बसथांबे, उड्डाणपूल आणि मुख्य रस्त्यांवर थांबत असल्याने वाहतुक विस्कळीत होत आहे. प्रवासी चढविणे-उतरविण्यासाठी वारंवार थांबणाऱ्या या बसमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिक फाटा, सीआयआरटी गेट, राजमाता जिजाऊ कमान, भोसरी उड्डाणपूल, गणेश साम्राज्य चौक, स्पाईन चौक, घरकुल चौक, भक्ती-शक्ती चौक, प्राधिकरण, रावेत, बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, भूमकर चौक, वाकड, दापोडी आणि सांगवी आदी भागांमध्ये टुरिस्ट बसेस मोठ्या प्रमाणात थांबत आहे.

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रातील कर्मचारी, एमआयडीसीतील कामगार, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना बसत असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही मार्ग मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे जगनाडे यांनी नमूद केले. अनेकदा नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहतूक पोलिसांवरही अतिरिक्त ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य चौक, बसथांबे, उड्डाणपूल आणि मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे थांबणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, आवश्यक ठिकाणी नो-पार्किंग आणि अधिकृत बसथांबा क्षेत्र निश्चित करावे तसेच वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा कुणाल जगनाडे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group