पिंपरी (Pclive7.com):- अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध भेसळ माफियांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा करत त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनित्रा अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या कारवाईमुळे अन्न व औषध भेसळ करणाऱ्या माफियांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या बेकायदेशीर कारभाराला आळा बसत आहे. त्यामुळे संबंधित माफियांकडून मुंढे यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

मारुती भापकर यांनी राज्य सरकारला विनंती करताना म्हटले आहे की, तुकाराम मुंढे हे प्रामाणिक, कर्तृत्ववान आणि धाडसी आयएएस अधिकारी असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी. या निवेदनावर मारुती भापकर यांच्यासह मानव कांबळे, डॉमिनिक लोबो, राजू साबळे आणि प्रकाश जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, या निवेदनातील दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.





















Join Our Whatsapp Group