पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच दशकपूर्ती स्मरणिका प्रकाशन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवार (दि.१८) रोजी गोविंद गार्डन येथील बासुरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सामाजिक कार्यकर्ते संदेश काटे तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. शंकरराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दशकभरातील वाटचालीचा आढावा घेतला. सचिव सखाराम ढाकणे यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला.
यावेळी संस्थेच्या दशकपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वार्षिक सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ कलावंतांनी भजन, अभंग आणि चित्रपट गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला शिंदे, भामिनी महाले आणि रवींद्र संधानशिवे यांनी केले. विवेकानंद लिगाडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीत आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या यशस्वी कार्यक्रमासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group