आळंदी (Pclive7.com):- आरटीओ चलानाची माहिती तपासण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये बनावट APK फाईल इन्स्टॉल करण्यास सांगून एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत आळंदी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा परिसरातून दोन आरोपींना अटक केली आहे. सायबर चोरट्यांनी मोबाईलचा अॅक्सेस मिळवून सुमारे ७० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडल्याची माहितीही समोर आली आहे.

व्हॉट्सॲपवर आली APK फाईल अन् लाखोंचा फटका!
फसवणुकीतील तक्रारदार हे भाजीपाला वाहतूक व्यवसाय करणारे ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘आरटीओ चलान’ नावाची APK फाईल आली होती. वाहनावरील दंड तपासण्यासाठी त्यांनी ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. मात्र, या फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर काही काळाने त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे संदेश मोबाईलवर आले. तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये वळवण्यात आल्याचे उघड झाले. या फसवणुकीत सुमारे ७० लाख रुपयांची एफडी मोडण्यात आल्याची बाबही समोर आली.

क्रेडिट कार्डच्या आमिषातून फसवणुकीचे जाळे
या प्रकरणात विष्णुप्रसाद वर्मा (वय २५) आणि विनोद मंडल (वय ४२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासानुसार, क्रेडिट कार्डची देय रक्कम भरण्याचे तसेच कार्डची मुदत वाढवून देण्याचे आमिष दाखवून कार्ड मिळवले जात होते. या कार्डांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन, पाच क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यांच्या पासवर्डशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांनो, अनोळखी APK फाईलपासून सावध राहा!
आरटीओ चलान तपासण्याच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमांवर आलेल्या अनोळखी APK फाईल्स इन्स्टॉल करू नयेत. तसेच, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. वाहनावरील ई-चलान तपासण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.


















Join Our Whatsapp Group