‘मराठा नवदुर्गा महिला सन्मान २०२६’साठी १७ ऑक्टोबरपर्यंत नामांकने पाठवण्याचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि आपल्या कार्यातून इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान करण्यात येणार आहे. अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने ‘मराठा नवदुर्गा महिला सन्मान २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मानासाठी पात्र महिलांची नामांकने १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठविण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, त्यांच्या संघर्षमय प्रवासाला समाजासमोर आणणे आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना संधी
आरोग्य व वैद्यकीय सेवा, शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, उद्योजकता, रोजगारनिर्मिती, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती, पर्यावरण संवर्धन, आपत्कालीन मदत आणि वंचितांच्या पुनर्वसनासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सन्मानासाठी विचार केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाजातील, आपल्या कार्यातून समाजहित जपणाऱ्या आणि इतरांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांना या उपक्रमासाठी नामांकन देता येणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या योगदानाला व्यापक प्रसिद्धी मिळवून देणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

नामांकनासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
नामांकन पाठविताना संबंधित महिलेचे संपूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता, कार्यक्षेत्र, सामाजिक कार्याचा अनुभव, राबविलेले उल्लेखनीय उपक्रम आणि त्यांच्या कार्यामुळे समाजाला झालेला ठोस फायदा यांची सविस्तर माहिती द्यावी. तसेच कार्याची छायाचित्रे, वृत्तपत्रांतील बातम्या, प्रमाणपत्रे आणि उपलब्ध पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी Google Form द्वारे नामांकन अर्ज भरावा. प्राप्त अर्जांतील माहिती आणि संबंधित महिलेच्या कार्याची पडताळणी केल्यानंतर सन्मानासाठी निवड केली जाणार आहे. केवळ नामांकन अर्ज भरल्याने सन्मान निश्चित होणार नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
१७ ऑक्टोबर अंतिम मुदत; येथे साधा संपर्क
नामांकन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक :
९४२२९६३०३५
९४२३९६६६८६

मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला योग्य ओळख मिळावी, त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून इतर महिलांनाही नवी उमेद मिळावी, यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील पात्र महिलांची नामांकने अंतिम मुदतीपूर्वी पाठवावीत, असे आवाहन अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group