पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना-भाजप युती झाल्यास मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, युती झाली नाही, तरी मावळात भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
युतीची बोलणी सुरू असतानाच, भाजपने सेनेला पालघर लोकसभेची जागा देण्याचे ठरविले असून, त्याबदल्यात मावळ लोकसभेची मागणी केली असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी पक्षनेते एकनाथ पवार यांना याबाबत विचारले असता, मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. पवार म्हणाले की, मावळात समाविष्ट चिंचवड विधानसभेला 30 हजार मतदान वाढले आहे. विधानसभेला सव्वाचार लाख मतदान आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांना विधानसभेला 1 लाख 26 हजार मते मिळाली होती. आता, लोकसभा लढविल्यास चिंचवडमधून 1 लाख 60 हजार मते घेऊ. पिंपरी मतदारसंघात साडेतीन लाख मतदान आहे. भाजपचे चिन्ह नसताना भाजप-आरपीआय (आठवले) युतीच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना 48 हजार मते होती. खरे तर चिन्ह नसल्याने 15 ते 20 हजार मते सेनेच्या गौतम चाबुकस्वार यांच्याकडे वळाली होती. या वेळी भाजपला या मतदारसंघात 70 हजार मते अपेक्षित आहे.
मावळात बाळा भेगडे भाजपचे आमदार आहेत, तेथे भाजपला 80 हजार मते मिळू शकतात, पनवेलला प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत. तेथे 90 हजार मते मिळू शकतात. चिंचवड, पिंपरी, मावळ, पनवेल या चार मतदारसंघात मिळून भाजपला 5 लाख मते मिळू शकतात. कर्जत-खालापूर, उरणमध्ये मिळून 1 लाख मते निश्चित मिळतील. युती झाली नाही, तरी भाजपचा उमेदवार मावळातून निश्चित विजयी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group