पिंपरी (Pclive7.com):- पुण्यात अपंग आयुक्त कार्यालयावर कर्णबधिर तरुणांनी केलेल्या आंदोलनावर, पुणे पोलिसांनी बेछूट व अमानवीय लाठीचार्ज केला, त्याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नागरी हक्क सुरक्षा समिती व प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पुढाकाराने सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. कर्णबधिर आंदोलकांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी यावेळी केली.
“आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बडतर्फीची कारवाई करावी तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करून त्याला योग्य ती कायदेशीर शिक्षा करण्यात यावी, आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून या आंदोलकांनी केलेल्या मागण्या ताबडतोब मान्य करून त्यांना न्याय द्यावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागण्याची वेळ येऊ शकते” असे मत नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या आंदोलनामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यासह नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, मिरज कडू, गिरीश वाघमारे संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते, छावा संघटनेचे धनाजी येलकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे हरीश मोरे, नितिन बनसोडे, छायावती देसले, अपना वतन संघटनेच्या राजश्री शिरवळकर, आम आदमी पक्षाचे प्रकाश पठारे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सर्वांनी झालेल्या घटनेबद्दल पुणे पोलीस व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. पुणे पोलीस व महाराष्ट्र राज्याच्या निषेधाच्या घोषणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दणाणून सोडला.





















Join Our Whatsapp Group