पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपत दिल्लीमध्ये मराठी आवाज बुलंद केला. देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणार खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मावळ मतदारसंघातील प्रश्न दिल्लीत मांडून ते सोडविण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे मावळात शिवसेनेच्या विजयाची हॅटट्रीक होईल, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.
थेरगाव येथे प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या निर्धार मेळाव्यात उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बानगुडे पाटील बोलत होते. मेळाव्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शहर सल्लागार मधुकर बाबर, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, अनंत कोऱ्हाळे, जिल्हा संघटिका शादान चौधरी, विमल जगताप, महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, बाळाभाई कदम, चिंचवड संपर्क प्रमुख अॅड. वैभव थोरात, राजू खांडभोर, पिंपरी चिंचवड महापालिका गटनेते राहुल कलाटे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, महिला संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसेकर, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, मीनल यादव, जितेंद्र ननावरे, विमल जगताप, किरण मोटे, संजय काटे, अमोल निकम, तुषार नवले, नवनाथ तरस, सोमनाथ गुजर, बाळासाहेब वाल्हेकर, बाबासाहेब भोंडवे आदी उपस्थित होते.
प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “निरोगी शरीरासाठी चांगला आणि अनुभवी डॉक्टर हवा, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि देशाचा कारभार चालविण्यासाठी अनुभवी आणि चांगला खासदार हवा. एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसताना देखील त्याला विद्वान म्हणण्याचा प्रकार राष्ट्रवादी पक्षात चालतो. शिवसेनेत विद्वत्तेला प्राधान्य दिलं जातं. प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये विदवत्ता निर्माण करण्याचे काम शिवसेना पक्ष करत आहे. आजवर देशाच्या राजधानीत मराठी माणसाला आवाज नाही, मराठी माणूस दिल्लीत जाऊन केवळ मुजरे करतो, असं ऐकलं होतं. मात्र श्रीरंग बारणे यांनी हा प्रघात मोडीत काढून महाराष्ट्राची अस्मिता जपत मराठी आवाज बुलंद केला. देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणार खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आपल्या मतदार संघातील प्रश्न देशाच्या राजधानीत मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. शिवसेना आणि भाजपच्या महायुतीमुळे हे स्थायी सरकार तयार होणार आहे. श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. ही कामे आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. काहीजण काम मुंगीएवढं करतात आणि त्याचा प्रचार हत्ती एवढा करतात. पण बारणे यांचं काम हत्तीएवढं आहे. त्यामुळे त्याचा प्रचार देखील हत्तीएवढाच व्हायला हवा. मावळ लोकसभेसाठी खासदार म्हणून श्रीरंग बारणे च कायम सार्थ ठरतील, असेही बानगुडे पाटील म्हणाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणा-यांनी देशाचा रंग उडवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बेरंग केला आहे. त्या बेरंगाचा रंग करण्याची ताकद श्रीरंग बारणे यांच्यामध्ये आहे. श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदार संघासाठी योग्य उमेदवार आहेत. असे मत बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत, तर ते महायुतीचे उमेदवार आहेत. असा निर्धार पनवेल येथील मेळाव्यात झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची साथ यामुळे राजकीय क्षेत्रात नवी उंची मिळाली आहे. आजवर नागरिकांनी दाखवलेला विश्वास प्रत्येक क्षणी लोकसभेत सार्थ केला आहे. दिल्लीमध्ये मराठीला आवाज नाही, हा पायंडा मोडून काढून सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम केला. स्वातंत्र्यानंतर सहा दशकांमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील काही दुर्गम आदिवासी पाड्यांकडे कधीच कुणाचं लक्ष गेलं नाही, तिथं पोहोचून तिथल्या लोकांना रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सोयी पुरविल्या आहेत. जिथं शासकीय योजना पोहोचत नाही, तिथं शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं आहे.
केवळ आश्वासने दिली नाहीत. तर प्रत्यक्ष काम करून दाखवलं आणि सर्वसामान्यांचा विश्वास मिळवला. सर्वसामान्यांना विकास हवा आहे. ते विकासालाच मत देणार आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वार्थी आणि लबाड लोकांना दूर करायला हवं. सर्वसामान्य नागरिक महायुतीलाच मत देतील आणि पुन्हा एकदा भारत देश सुरक्षित हातामध्ये देतील, असा विश्वास देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
बाळाभाई कदम म्हणाले, “सर्व कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला लागले पाहिजे. विरोधक कोण आहेत, याचा विचार न करता आपण आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. प्रचार करत असताना नागरिकांशी संवाद साधत असताना अनेक संभ्रम तयार केले जातील. पण त्या संभ्रमाला बळी न पडता निष्ठेने काम करायलाच हवं.”
आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, “श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात भरीव काम केलं आहे. बोपखेल प्रश्न, पुणे-लोणावळा रेल्वे चौपदरीकरण, माथेरान रेल्वे पुनरुज्जीवन, पासपोर्ट कार्यालय, एच ए कंपनी प्रश्न, पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला पाठपुरावा अशी अनेक महत्वाची कामे सांगता येतील. याशिवाय अनेक शेकडो प्रश्नांवर बारणे यांनी देशाच्या राजधानीत आवाज उठवला आहे. श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही चाबुकस्वार यांनी व्यक्त केला.
गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्या बाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती. वरच्या पातळीवर काहीही झाले तरी मावळ मतदार संघाबाबत आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निश्चिंत होतो. कारण मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार असणार आणि तो उमेदवार श्रीरंग बारणे हेच असणार असा ठाम विश्वास आधीपासूनच होता. सर्व कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून मिळणारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडायला हवी. काही लोकांकडे बोलण्यासाठी काही नसेल तर ते अफवेचं पीक पिकवतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहायचं, असा सल्ला देखील कलाटे यांनी दिला.
गजानन चिंचवडे म्हणाले, “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण पाळणा-यांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. ‘रडायचं नाही, लढायचं’ हा मंत्र बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. तो मंत्र आपण तंतोतंत पाळायला हवा. मावळ लोकसभा मतदार संघात भगवी हॅट्रिक करण्याची नामी संधी शिवसेनेला मिळाली आहे. या संधीचं आपण सोनं करू.”
उर्मिला काळभोर म्हणाल्या, “श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. जनमाणसातली प्रतिमा त्यांनी जपली आहे. मावळ भागात बारणे यांची पोहोच जास्त आहे. विरोधी पक्षांची नावे घेऊन त्यांना उगाच मोठं करण्याची काही गरज नाही. महिलांनी घराघरात जाऊन बारणे यांनी केलेलं काम पोहोचवायला हवं.”
सूत्रसंचालन योगेश बाबर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group