पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘घर घर संविधान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज वाल्हेकरवाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख विद्यार्थी आणि ८ लाख पालकांपर्यंत भारतीय संविधानाची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समिती सभापती रविना सागर अंगोळकर होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, योगिता बारणे, उपायुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, संविधान अभ्यासक नूर खा पठाण, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रविना अंगोळकर म्हणाल्या की, “‘घर घर संविधान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचेल. यामुळे संविधाननिष्ठ आणि जागरूक समाज घडण्यास मोठी मदत होईल.”

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी संविधानातील लोकशाही, समता आणि बंधुता यांसारखी मूल्ये बालवयातच मुलांच्या मनावर रुजविण्याची गरज अधोरेखित केली. “संविधानाची ओळख लहानपणापासून झाल्यास उद्याची पिढी अधिक जबाबदार, सुसंस्कृत आणि जागरूक नागरिक म्हणून घडेल,” असे ते म्हणाले.
संविधान अभ्यासक नूर खा पठाण यांनी भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगतीचा मूलभूत दस्तऐवज असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती आणि त्याचे सविस्तर विवेचन दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्यांची जाणीव होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक घडण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमात उपायुक्त अण्णा बोदडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी आभार मानले. यावेळी सेवानिवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे, रवींद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी, अनिल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group