पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात मारुती भापकर यांनी महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांना निवेदन दिले आहे.

भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, ऑटो क्लस्टरसमोरील महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असून, महापालिकेच्या स्थापनेपासून तिच्या मुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यामुळे नवीन मुख्यालयासमोर महाराजांचा भव्य-दिव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारणे हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रिय, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या आदर्शातून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी प्रेरणा घेतील. तसेच मुख्यालयातील विविध कार्यक्रमांची सुरुवात महाराजांना अभिवादन करून करण्याची परंपरा निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या मागणीसंदर्भात सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुतळा उभारण्याचा निर्णय घ्यावा आणि हे ऐतिहासिक कार्य सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात पूर्ण करावे, अशी विनंती मारुती भापकर यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group