पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप अजूनही सक्रीय झालेले नाहीत. बारणे यांनी जगताप यांच्या घरी जाऊन युतीचा प्रचार करा अशी विनंती केली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जगतापांची नाराजी दूर करून या दोघांत समेट करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरलायं. दरम्यान, बारणेंच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला नसताना लक्ष्मणभाऊंची एक पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. “आम्हाला कोणी गृहीत धरू नये, अफवांना बळी पडू नका, भाऊंनी अद्याप आदेश दिलेला नाही”, असा इशाराच कार्यकर्त्यांना त्यातून दिला गेला आहे. आता नेमकी ही पोस्ट कोणी व्हायरल केली हे स्पष्ट झाले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच ‘खळबळ’ उडाली आहे.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात संघर्ष टोकाला गेलेला होता. दोघांमध्ये धुमसती आग असताना मावळ लोकसभेसाठी उमेदवारी बारणे यांनी पदरात पाडून घेतली. तत्पूर्वी जगताप समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. आता बारणे यांनी प्रचार सुरू केला असताना जगताप यांनी अजून कोणतीही सक्रीयता दाखविली नाही. दुसरीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की, जगताप समर्थक राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करणार.., मात्र ही केवळ चर्चा आहे. यावर कोणीच थेट भाष्य करत नसले तरी जगताप नेमकी काय भूमिका घेणार..? कार्यकर्त्यांना काय संदेश देणार..? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, लक्ष्मणभाजगतापभाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये बारणेंच्या विषयी प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मजकूर असलेली भाऊंची इमेज व्हायरल होत आहे. त्यात नमूद आहे की, “आम्हाला आमचे भाऊ जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला आमचे समर्थन नाही. कोणत्याही आफवांना बळी पडायचं नाही आणि कुणी गृहीत धरूही नका. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा ‘शब्द’ तोच शेवट आणि तोच आदेश माणतो आम्ही, म्हणून कसं तर भाऊ म्हणतील तसं…” अशी साद देखील कार्यकर्त्यांना घालण्यात आली आहे. परंतु, ही इमेज नेमकी तयार केली कोणी, व्हायरल कशी केली गेली, याची माहिती समोर आलेली नाही.