पिंपरी (Pclive7.com):- जगातील उंच हिमालयीन शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणे प्रत्येक गिर्यारोहकाची स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाडस, जिद्द आणि चिकाटी लागते. हे धाडस केले आहे पिंपरी चिंचवडमधील गिर्यारोहण अनिल वाघ यांनी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अग्निशमक दलात फायरमन पदावर अनिल वाघ हे कार्यरत आहेत. काल बुधवारी पहाटे सहाच्या विमानाने ते काठमांडूच्या दिशेने या मोहिमेकरिता रवाना झाले आहेत. त्यांच्या या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी गंभीर अपघातामुळे अनिल वाघ यांचे एव्हरेस्ट सर करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. हे स्वप्न या वर्षी पूर्ण करण्याचा त्याने निर्धार केला आहे. अनिल वाघ यांनी सह्याद्री रांगेतील अतिशय कठीण समजला जाणारा लिंगाणा किल्ला कोणतेही साधन सामग्रीचा वापर न करता अवघ्या २२ मिनिटात सर केला आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास ८० वेळा लिंगाणा सर करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच सह्याद्रीतील अनेक ट्रेक गड किल्ले त्यांनी लीलया सर केले आहेत. तसेच हिमालयातील अनेक शिखरे त्यांनी सर केले आहेत. आता माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे त्यांचे लक्ष आहे.
या मोहिमेबाबत अनिल वाघ म्हणाले, तीन वर्षापासून एवरेस्ट मोहिमेची तयारी करीत आहे. २०१८ एप्रिल महिन्यात ते माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु मोहिमेच्या एक आठवडा अगोदर त्यांचा दुचाकीवरून घरी जात असताना अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. पाच दिवस ते कोमामध्ये होते. या कारणास्तव त्यांची मागील वर्षाची मोहीमही होऊ शकली नाही.
या मोहिमेसाठी त्यांना माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आर्थिक मदत केली आहे. सचिन (तात्या) तुपे, पी.के.राव, एन.के.गुप्ता, महाराष्ट्र मंडळ (टांझानिया), मुम्बई अग्निशामक दलाचे प्रमुख रहाणंदळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ही मोहिम जेष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे यांच्या मार्गदर्शनखाली संपन्न होणार आहे.






















Join Our Whatsapp Group