पिंपरी (Pclive7.com):- रहाटणीतील कोकणे चौकात भरदिवसा विशेष म्हणजे राज्याचे पोलीस माहसंचालक प्रथमच पुणे दौऱ्यावर असताना दुकानात घुसून, सराफावर गोळीबार करुन तब्बल अडीच किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन दरडोखोरांना अटक करण्यात वाकड पोलीसांना यश आले आहे. या गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुल जप्त केली आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून २३ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.
एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि दहा कर्मचाऱ्यांनी ३३ दिवस हरियाणा राज्यातील जंगलात राहून ही कामगिरी केली आहे. अटक दरोडेखोरांकडून पाऊन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुभाष मोहनलाल बिशनोई (वय २४, रा. मंगाली मोहबत, ता. व जि. हिसार, रा. हरियाणा) व महिपाल दुधाराम जाट (वय २१, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखी साथीदार अद्याप फरार आहेत. दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) हे गोळीबारात जखमी झाले होते.