पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओहाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा ‘घरवापसी’ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ओव्हाळ यांचा प्रवेश घेण्यात आला.
चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शेखर ओव्हाळ यांच्या घरवापसीमुळे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे व मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांना त्यांच्या जनसंपर्काचा मोठा फायदा होणार आहे.
पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार आज शहरात होते. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पवार यांनी त्यांच्या ‘पॉवर गेम’ला सुरुवात केली आहे. आज थेट भाजप आमदार समर्थकांचीच घरवापसी करून विरोधकांना एक प्रकारे धक्काच दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी उपमहापौर राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, निलेश डोके यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शेखर ओव्हाळ यांचे रावेत, पुनावळे परिसरात चांगले वर्चस्व आहे. कचरा डेपोसंदर्भात त्यांनी यापूर्वी खूप मोठे जनआंदोलन उभारले होते. ओव्हाळ यांनी नागरी समस्यांसाठी केलेली अनेक आंदोलने आजही चर्चेत आहेत. मुख्य म्हणजे शेखर ओव्हाळ यांच्याकडे मोठी तरुणांची फळी आहे. यापूर्वी ओव्हाळ हे अजित दादांच्या विचाराने प्रेरित होवून राष्ट्रवादीमध्येच काम करत होते. परंतु २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कमळ हातात घेतले होते. शेवटी अजित पवार यांनी शेखर ओव्हाळ यांची भेट घेवून ओव्हाळ यांच्या हातात राष्ट्रवादीचे घड्याळ दिले आहे. शेखर ओव्हाळ यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार या दोघांनाही चांगला फायदा होवू शकतो.