पिंपरी (Pclive7.com):- रेशन दुकानदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अन्नधान्याचा मोठा काळा बाजार शहरात सुरू आहे. गोरगरिबांना त्यांचं हक्काचं अन्नधान्य मिळालाच पाहिजे. याप्रकरणी दोषी दुकानदार आणि अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसात कारवाई न केल्यास युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अन्नधान्य वितरण परीमंडल अधिकारी पिंपरी चिंचवड यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, रुपेश कदम, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभागप्रमुख राजेश वाबळे, विभागसंघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य वैभवी घोडके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, राहुल पलांडे, विनय खमगल, सनी कड, अजय पिल्ले उपस्थित होते.
युवासेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील रेशन दुकानदार व भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने अन्नधान्याचा काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू नागरीकांना स्वस्त धान्य न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असल्या गैरप्रकाराला आळा घातला गेला पाहिजे. धान्य दिल्यानंतर POS मशिनद्वारे पावती देणे बंधनकारक करावे. तसेच सुरू असलेला हा काळाबाजार थांबलाच पाहिजे. याप्रकरणी दोषी दुकानदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेने निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी पिंपरी युवासेनेतर्फे प्रतिक्षा घुले व निलेश हाके म्हणाले की, येत्या १५ दिवसात भ्रष्ट अधिकारी व दुकानदार यांच्यावर कारवाई न झाल्यास युवासेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.



















Join Our Whatsapp Group