पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरामध्ये नामांकित असलेल्या दि.सेवा विकास को-ऑप. बँक लि. मध्ये संचालक मंडळाने कोट्यावधींचा अपहार केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने विनातारण महत्तम कर्ज देतानाही मर्यादेचेही उल्लंघन केले आहे. एक कोटी किंवा त्यावरील कॅश क्रेडिट कर्जासंदर्भातही बँकेने आवश्यक खबरदारी घेतली नाही. अनेक सभासदांनी कर्ज मंजुरी, विनियोग, कर्ज तारण या संदर्भात सहकार विभागाकडेही अनेक तक्रारी केलेल्या आहेत. यामध्ये तथ्य असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालात दिसून आले आहे. याबाबत तक्रारदार कुमार पहेलजराय मेंघाणी, प्रकाश आसवानी, सुरेश जोधवानी, बन्सी धनानी, नितीन रोहरा यांनी कोट्यवधी खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणा-या सेवा विकास बँकेच्या संचालक मंडळावर कडक कारवाई करून, त्यांच्याकडून बँके खातेदार, सभासदांच्या पै-पैचा हिशोब घेऊन तो वसूल करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. मध्ये आम्हापैकिंचे बचत व चालु खाते असून, सदर बँकेचे आम्ही भागधारक आहोत. सरुवातीस आमच्या सिंधी समाजाच्या हितासाठी दि सेवा विकास को- ऑ. बँकेची स्थापना झाली होती. सन २०१० ते सन २०१९ या कालावधीत दि सेवा विकास को – ऑप बँक लि या बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज विभाग प्रमुख, संबंधित शाखा प्रमुख यांनी संगनमत करून बँकेचे खातेदार, ठेवीदार व सभासद यांच्या ठेवींच्या पैशांचा गैरवापर करुन, चुकीच्या पद्धतीने निदर्शनास आलेले १०४ खातेदार व इतर यांना कर्ज वाटप केलेले आहे. याबाबत बँकेचे लेखा परिक्षण करून व गुन्हा दाखल करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अर्ज करण्यात आले होते.
तसेच दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. या बँकेतील बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज विभाग प्रमुख, संबधित शाखा व्यस्थापक यांनी बँकेतील व्यवहारातील अफरातफर या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्त. पिंपरी चिंचवड व पोलीस निरिक्षक, पिपरी पोलिस ठाणे येथे वेगवेगळ्या इसमांनी दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. विरुध्द तक्रारी अर्ज केले होते. सदर तक्रारी अर्जाच्या व पिंपरी पोलीस ठाणे येथील (१) गुन्हा रजिस्टर नं. २३५ / २०१९ भा. द. वि. कलम ४०६, ४२०, (२) गुन्हा रजिस्टर नं. २४१ / २०१९ भा. द. वि. कलम ४०६, ४२० या अनुशंगाने आर्थिक गुन्हे शाखा
पिंपरी चिंचवड येथील पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी सहनिबंधक सहकारी संस्था ( लेखा परीक्षण) साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना दिलले पत्र पाहता त्यातील मजकूर असा की, दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. यांनी वेगवेगळ्या शाखेतून बँकचे खातेदार यांनी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व सहकार कायद्याचे कोणतेही नियम व अटींचे पालन न करता दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. या बँकेतील चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज विभाग प्रमुख, संबधित शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करून बँकेचे खातेदार यांना त्यांची ऐपत नसताना चुकीचे कर्ज वाटप केलेले आहे. सदर कर्जदार यांची तपासणी करून कर्ज प्रकरणात अनियमितता, गैरप्रकार, गैरव्यवहार व अपहारामुळे याबाबतची जबाबदारी निश्चित करुन त्याबाबत बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करावा, असे पत्र दिले होते.
त्याप्रमाणे मा.श्री सतिश सोनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कार्यालयीन जावक क्रमांक सआ / लेखापरीक्षण/कार्या – १९/ सेवा विकास बँक/ चालेप/१६४ / अन्वये दिनांक १४/०२/२०१९ रोजी दि सेवा विकास को-ऑप बँक लि. या बँकेची चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी श्री. आर. यु. जाधवर, सहनिबंधक सहकारी संस्था, (लेखा परीक्षण) साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती करुन त्यांना दोन महिन्यात चाचणी लेखा परिक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करण्याबाबत आदेश केला. त्याप्रमाणे श्री. आर. यु. जाधवर, सहनिबंधक सहकारी संस्था (लेखा परीक्षण) साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांचे कार्यालयीन जावक क्रमांक सआ / लेप /कक्ष-५/ सेआ/ वि बँक/ तपासणी अहवाल / ५५२६/२०१९ दिनांक १२/०६ /२०१९ अन्वये पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांना पृष्ट क्र. १ ते ६३८ व परिशिष्ट २० असा अहवाल सादर केला.
सदर बँकेच्या उपरोक्त अपहाराविषयचा अहवालाची संपूर्ण माहिती, जनमाहिती अधिकारी लेखापरिक्षण विभाग साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातून माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेली आहे. श्री. आर. यु. जाधवर, सहनिबंधक सहकारी संस्था (लेखा परिक्षण) साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या अहवालाची पडताळणी केली. त्यामध्ये सेवा विकास को ऑप बँक लि. यांनी बँकेच्या वेगवेगळ्या शाखेतून बेहिशोबी कर्जवाटप केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून कोट्यवधी खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणा-या सेवा विकास बँकेच्या दोषी संचालक मंडळावर कडक कारवाई करावी. जेणेकरून त्यांच्याकडून बँके खातेदार, सभासदांच्या पै-पैचा हिशोब घेऊन त्याची वसुली होऊन बँक आर्थिक अडचणीतून बाहेर येईल व खातेदारांचा बँकेवर आणखी विश्वास दृढ होईल, असे तक्रारदार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.