पिंपरी (Pclive7.com):- वाकड, पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वपक्षीय नगरसेवकाच्या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेच्या समोर सकाळपासून नगरसेवक तुषार कामठे यांनी प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांसह उपोषण सुरु केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पिंपळेनिलख, विशालनगर, वाकड भागातील पाणीपुरवठा कायम विस्कळीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून विस्कळीत पाणी पुरवठ्याची सतत समस्या भेडसावत आहे. पिंपळे निलख, विशालनगर आणि वाकड हा भाग शहराच्या शेवटचे टोक आहे. या भागात सतत विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे. पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पिंपळेनिलख परिसरात केवळ दहा ते वीस मिनिटे पाणी येते. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत असताना प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल १९ निवेदने दिली. ३ वेळा आंदोलन केले. तरी, देखील पाणीपुरवठा सुरळित होत नाही, असा आरोपही नगरसेवक कामठे यांनी केला. तसेच पिंपळेनिलख परिसरात पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा दिली. तरी, देखील पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची टाकी बांधली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.






















Join Our Whatsapp Group