पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघातून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप विरुद्ध अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कलाटेंच्या बंडखोरीमुळे जगताप यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आज अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत तीघांनी माघार घेतली. मात्र, कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता जगताप आणि कलाटे यांच्यात लढत होणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका सर्वपक्षांनी स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली होती. मोदी लाटेत देखील कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ६३ हजार ४८९ मते घेत चांगली लढत दिली होती. यावेळी शिवसेना-भाजपची महायुती आहे.
यावेळी राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. जगताप यांची ही तिसरी निवडणूक आहे. २००९ मध्ये जगताप सर्वांची मोठ बांधून अपक्ष निवडून आले होते. तर, २०१४ मध्ये भाजपकडून ते निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर पुन्हा कलाटे यांचे तगडे आव्हान असणार आहे. भाजपचे नाराज नगरसेवक देखील कलाटे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची मोठ बांधून कलाटे अपक्ष निवडून येतात की जगताप हॅट्रट्रिक करतात हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडमध्ये ‘हे’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!
भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांच्यासह सुरज खंडारे, डॉ. मिलिंदराजे भोसले, राजेंद्र काटे, रवींद्र पारधे हे निवडणुकीच्या मैदानत आहेत. तर कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे यांनी माघार घेतली आहे.






















Join Our Whatsapp Group