पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ‘वीकएंड’ची संधी साधत वाकड, रहाटणी, थेरगाव परिसरातील सुमारे २० हून अधिक सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. मतासाठी नव्हे विकासासाठी आर्शिवाद द्या, अशी साद त्यांनी आज (शनिवारी) मतदारांना घातली. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान सोसायटीमधील रहिवाशांनी कलाटे यांचे दणक्यात स्वागत करीत त्यांना पाठींबा दिला.
वाकड, थेरगाव, रहाटणी परिसरात आयटी क्षेत्रासह विविध ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सलग सुट्टीचे आल्याने आज कलाटे यांनी मतदारांशी संवाद साधला. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला गाठीभेटींचा दौरा रात्री दहाच्या सुमारास संपला.
या दरम्यान कलाटे यांनी अनेक सोसायट्यांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेतल्या. पाणी, रस्ते, कचरा, वाहतूक अतिक्रमण अशा अनेक समस्या यावेळी नागरिकांनी मांडल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, तरुण, लहान मुले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कोणत्याही एका भागाचा विकास करण्याच्या मागे न लागता सर्व भागांचा हायटेक व शाश्वत विकास आपण साधू, अशी ग्वाही कलाटे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याला सोसायटीधारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. क्रिस्टल हाईटस्, ओमेगा, मधुबनसह विविध सोसायट्यांनी यावेळी पाठींबा दिला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची चाहूल लागली आहे.