पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून कलाटे यांना विजयी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. त्यामुळे आघाडीचा आज (शनिवारी) पासून प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. कलाटे यांना यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांनी पाठींबा दिला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे कलाटे सर्वपक्षीय उमेदवार ठरले आहेत. आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नुकतेच लेखी पत्र देत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलाटे यांच्या विजयाचा संकल्प सोडला आहे. कार्यकर्त्यांनी आजपासून मतदार संघात झंझावाती प्रचार सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अल्पावधीत पिंपरी-चिंचवड शहरात आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते एकवटले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात सुमारे 20 हजार मतदार वंचित बहुजन आघाडीला मानणारे आहेत. त्याचा फायदा कलाटे यांना होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेसाठी कलाटे यांना आपला पाठींबा असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्येकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सुरुवात करावी. कलाटे हे विजयी होतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना आंबेडकर यांनी केल्या आहेत.
आंबेडकर यांचा आदेश प्राप्त होताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात आघाडीची ताकद दाखवून देवू, कलाटे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करु, असा विश्वास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी कलाटे यांच्या प्रचारात उतरल्याने चिंचवडचे रण चांगलेच तापले आहे.






















Join Our Whatsapp Group