पिंपरी (Pclive7.com):- मराठा सन्मान मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षण रद्द झाले अशी खोटी अफवा पसरवणारे नामदेव जाधव यांच्या विरोधात पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मिडीयच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्यासाठी ‘आरक्षण’ रद्द झाले अशी खोटी अफवा पसरवून हायकोर्टाचा अपमान व मराठा समाजाची फसवणुक केल्याबद्दल ‘सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड’ तर्फे तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करायची मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्या प्रत्येकाला मराठा सन्मान मोर्चा धडा शिकवेल अशा इशाराही यावेळी देण्यात आला.
संविधान व हायकोर्ट हे सर्वोच्च आहे. त्यांचा आदेशाबद्दल खोटे व्हिडीओ पसरवणे या संविधानाचा अपमान आहे. तो पण कधीही सहन केला जाणार नाही, नामदेव जाधव यांनी जाणीवपुर्वक केलेली चुक मान्य करावी अन्यथा आपल्याला कायदेशीर तडाखा देण्यात कोणतेही हयगय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मराठा सन्मान मोर्चाचे समन्वयक कुणाल साठे, प्रीतम मेटे, अभिजित शिंदे, यशवंत कर्डीले, जितेंद्र सातव, रोहित भालके, युवराज पाटील, निखिल भालके, निलेश चासकर उपस्थित होते.