पिंपरी (Pclive7.com):- स्वत:च्या मुलांची शारीरिक तंदुरुस्ती टिकून रहावी, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. त्याच, हेतूने पिंपरी-चिंचवड मधील ऋतुराज गायकवाड याला त्याच्या आई-वडिलांनी वयाच्या ११ व्या वर्षी थेरगाव येथील पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये घातले. ऋतुराज मुळात अतिशय शांत, मितभाषी आणि संयमी. मात्र, फलंदाजीत गोलंदाजांना दया-माया न दाखविता तो तडाखेबंद फलंदाजी करतो. रांची येथे सुरू असलेल्या प्रा.दि.ब.देवधर क्रिकेट स्पर्धेत त्याने भारत ब संघाकडून खेळताना भारत अ संघाविरुद्ध सुरेख शतकी खेळी करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
गायकवाड याचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे. मात्र, अनेक वर्षांपूर्वी त्याचे आई-वडिल जुन्या सांगवीत स्थायिक झाले. याच ठिकाणी ऋतुराज याचे लहानपण सरले. थेरगावच्या व्हेरॉकल – वेंगसरकर अकादमीत दाखल झाल्यावर तेथील प्रशिक्षकांनी त्याच्यातील गुण हेरून त्याच्या अंगभूत कौशल्याला पैलू पाडण्यास सुरूवात केली.
प्रशिक्षक मोहन जाधव, फिटनेस ट्रेनर डॉ. विजय पाटील आदींचे योगदान मोलाचे राहिले. डॉ. पाटील यांच्या प्रयत्नामुळे ऋतुराज अनफिट असल्याच्या कारणावरून कधी संघाबाहेर राहिला नाही. ३१ जानेवारी १९९७ मध्ये ऋतुराजचा जन्म झाला. १६ वर्षाखालील, १९ वर्षांखालील आणि २२ वर्षांखालील गटात त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. उजव्या हाताने फलंदाजी करत असलेल्या ऋतुराज याने दिल्ली येथे आॅक्टोबर २०१६ ला झालेल्या झारखंड विरूद्ध महाराष्ट्र सामन्यामधून प्रथम श्रेणीच्या क्रिकेट मध्ये पदार्पण केले. तर फेब्रुवारी २०१७ ला कटक येथे झालेला अ श्रेणीचा हिमाचल प्रदेश विरूद्ध महाराष्ट्र असा पहिला सामना तो खेळला. याच वर्षी, त्याने बडोद्याला झालेल्या मुंबई विरूद्ध महाराष्ट्र ट्वेंटी-२० सामन्यात भाग घेतला.
प्रथम श्रेणीचे त्याने आत्तापर्यंत १५ सामने खेळले असून २५ डावांत एकदा नाबाद रहात त्याने ९१० धावा केल्या आहेत. त्यात त्याने वैयक्तिक सर्वोच्च १२६ धावांची नोंद केली आहे. ३ शतके, ४ अर्धशतके त्याने झळकाविली आहेत. तर अ श्रेणीच्या ४८ सामन्यांत ४७ डावांमध्ये त्याने २ वेळा नाबाद राहत २२१२ धावा केल्या असून नाबाद १८७ अशी वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. तर ट्वेंटी२० मधील १७ सामन्यांत त्याने नाबाद ५५ धावांच्या वैयक्तिक सर्वोच्च खेळीसह ४२४ धावा केल्या आहेत. मागील वर्षी त्याची चेन्नई सुपरकिंग्स संघात निवड झाली होती. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.