पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुल बांधण्याचे काम रखडले आहे. गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करूनही महापालिका आयुक्त आणि प्रशासनाकडून या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संदीप वाघेरे यांनी स्मरणपत्र दिले आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी वाघेरे गावामध्ये पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुल बांधण्याचे काम करण्याची विनंती वारंवार करण्यात आली आहे. या पुलाच्या कामासंदर्भात दि. २१/११/२०१७, दि. १२/०३/२०१८, दि. ०७/०९/२०१८, दि. २४/०१/२०१९ रोजी आयुक्तांना पत्र दिले आहे. सदर कामाबरोबर पवना नदीवर कोल्हापुर पद्धतीचा बंधारा बांधल्यास नदीतील पाणी अडवुन मिलेट्री डेअरी फार्म परिसरामध्ये महानगरपालिकेतर्फे वृक्षारोपन करण्यात आलेल्या वृक्षांना पाणी देण्यास सोयीचे होणार आहे. तसेच पिंपरी व पिंपळे सौदागर दरम्यान होणारी वाहतुक कोंडी समस्या सुटणार आहे. परंतु सदर समांतर पुल बांधण्याची मानसिकता महापालिका प्रशासनाची अजिबात दिसुन येत नाही. गेली दोन वर्ष सातत्यपुर्ण पाठपुरावा करुन देखील सदरचे काम मार्गी लागत नसल्याने महापालिकेसाठी हि बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. तसेच आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दिस काळीमा फासणारी आहे. सदर समांतर पुल बांधणेबाबतचा प्रस्ताव ‘ग’ क्षेत्रीय समिती मध्ये दिनांक १४/०५/२०१९ च्या मासिक सभेमध्ये देखील सर्वानुमते मंजुर होऊन देखील अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तरी याप्रकरणी आयुक्तांनी स्वत: जातीने लक्ष घालुन पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुल बांधणेचे काम त्वरित मार्गी लावावे अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group