पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्या वतीने ‘रनथॉन ऑफ होप-हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन रविवार दि. ८ डिसेंबर रोजी निगडी येथे केले असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता ही स्पर्धा निगडी प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेसमोरील मैदान येथून सुरु होईल. तसेच तेथेच या स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते करण्यात येईल. सदरील स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत आहे. यावेळी रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत २७०० शालेय विद्यार्थी, ३ हजार औद्योगिक क्षेत्रातील, सर्वसाधारण गटातुन १५०० जणांनी सहभाग नोंदवला आहे, असे सुमारे ७ हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी २१ किमी, १० किमी, ५ किमी अशा चार गटांची विभागणी करण्यात आलेली आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र, अल्पोपहार देण्यात येईल. या व्यतिरिक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचारी वर्गासाठी विशेष ५ किमी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातून ३ विजेते घोषित केले जातील. २१ किमी गटासाठी पहिले बक्षीस २५ हजार,दुसरे बक्षीस १५ हजार, तर तिसरे बक्षीस १० हजार आहे. एकूण बक्षिसाची रक्कम ४ लाख आहे.
सहभागी होण्यासाठी दि. ५ डिसेंबर पूर्वीwww.runthon.org.in किंवा ९८९०५०५१९४ या वर संपर्क करावे. या स्पर्धेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब निगडीच्या माध्यमातून गरिबांवर मोफत शस्त्रक्रिया, हॅपी व्हिलेज, शौचालय, शैक्षणिक साहित्य वाटप, जलसंधारण योजना, जलसाठा अशा योजना राबविण्यात येत आहे. यावेळी क्लबच्या सचिव प्रणिता आलूरकर, नियोजित अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी हे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group