पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ७९५५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार असून, अप्रत्यक्ष म्हणजेच निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेली पिंपरी चिंचवड ही पहिली महापालिका ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसेच नेते अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळेच हा निर्णय त्वरित झाला असून याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसलाच जात असल्याचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मयुर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, अंबर चिंचवडे, तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्याला पाच वर्षात केवळ आश्वासनांची गाजरे वाटली. कोणताही प्रमुख निर्णय त्यांना घेता आला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने सातवा वेतन आयोग करीता सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र भाजपकडून त्यांना पदरी निराशाच मिळाली. दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सर्वप्रथम सातवा वेतन आयोग लागू तात्काळ होणार असल्याची घोषणा केली होती. आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाली. हा निर्णय केवळ अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळेच तात्काळ झाला आहे. म्हणून इतर कोणी काही म्हणत असले तरी, याचे श्रेय केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला जात जात असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत करत ढोल ताशांच्या गजरात महापालिका मुख्यलयात जल्लोष केला. या निर्णयाचा पिंपरी चिंचवड महापालिकेमधील एकूण ७ हजार ९५५ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतन लाभ मिळणार आहे. महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १७ ते २२ टक्के इतकी वेतनवाढ होणार आहे.