पिंपरी (प्रतिनिधी):- नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे यांचा वाढदिवस बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच कै.नागुभाऊ गतीराम बारणे मेडिकल फाउंडेशनचे उद्घाटन यानिमित्त होणार आहे. थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे दि.२५ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते होणार अाहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. तसेच आमदार महेशदादा लांडगे, जिल्हा रुग्णालय सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नांदापूरकर, सुप्रिडेंट ऑफ डी.वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल डॉ. हनुमंत चव्हाण, वायसीएम हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात रूग्णांना मोफत औषधे वाटप, मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील याठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सर्वकष निरोगी आरोग्य प्राप्तीसाठी रोगाच्या निदानापासून रोग निवारणापर्यंत उपायोजना केल्या जाणार आहेत. यात हृदयरोग शस्त्रक्रिया, किडनी विकार व प्रत्यारोपण हाडांचे व मणक्याचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग, बॉडी चेकअप, कान-नाक-घसा, अनियंत्रित रक्तदाब आणि शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच लहान मुलांच्या हृदयावरील वरील उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व आजारांवर आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या शिबिरामध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल, रूबी केअर हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल थेरगाव यांचा सहभाग असणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांनी ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा असलेले आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनिंग कार्ड सोबत आणावे. तसेच पूर्वी काही आजार असल्यास त्याची कागदपत्रे देखील घेऊन यावे. या शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक माजी विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे यांनी केले आहे.