पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्षपदी आमदार महेशदादा लांडगे यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आकुर्डी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा आज केली आहे.

यावेळी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, भाजपा युवा शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे, भाजपा महिला शहराध्यक्ष शैला मोळक, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेच्यापूर्वी भाजपाच्या झालेल्या बैठकीत शहराध्यक्षपदासाठी महेश लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड. माधवी नाईक यांनी जाहीर केले.
२०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत तत्कालिन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात भाजपाने घवघवीत यश मिळवले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार करण्यात महेश लांडगे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महेश लांडगे यांनी दणदणीत विजय मिळवत आपणच शहराचे बाहुबली असल्याचे सिध्द करून दाखवले होते. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या झंझावातापुढे भाजपाची सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान महेश लांडगे यांच्यापुढे असणार आहे.






















Join Our Whatsapp Group