पिंपरी (Pclive7.com):- राजकीय पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय पक्षाच्या अनेक कार्यक्रमात, आंदोलनात या झेंड्याचा मोठ्या प्रमाणत वापर होत असतो. त्यावेळी अनेक वेळा उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणाऱ्या झेंड्याचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या नव्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लेखी पत्र दिले आहे.
मारूती भापकर यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे तसेच भारताचे आराध्य दैवत असून ते विश्ववंदनीय युगपुरुष आहेत. शिवरायांनी हिंदवी स्वराजाची स्थापना करताना रयतेच्या हितासाठी स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली. त्या राजमुद्रेचा वापर करूनच स्वराज्याचा कारभार होऊन त्यातूनच रयतेला अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच शिवचरित्रात शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्र शासन देखील याच राजमुद्रेचा प्रशासकीय कामकाजात प्रतिक म्हणून वापरत आहे.
प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यानुसार असे समजते कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला पक्ष २३ जानेवारीला वर्धापन दिन साजरा करत आहे. आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाला मनपूर्वक शुभेच्छा. असे समजते कि आपल्या पक्षाचा पूर्वीचा झेंडा बदलून त्या झेंड्यातील निळा व हिरवा रंग काढून आता आपल्या पक्षाचा झेंडा संपूर्ण भगवा रंग असणारा झेंडा आपण निश्चित करणार आहात. त्याबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही. मात्र या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराजमुद्रा वापरली जाणार आहे हे अत्यंत चुकीचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे, पंथाचे नसून ते युगपुरुष व संपूर्ण भारताची अस्मिता आहे. महाराज राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्यावर सर्व जाती, धर्म, पंथ व सर्व विचारधारेच्या लोकांचा समान अधिकार आहे. मात्र, राजकीय पक्षाचा झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय पक्षाच्या अनेक कार्यक्रमात, आंदोलनात या झेंड्याचा मोठ्या प्रमाणत वापर होत असतो. त्यावेळी अनेक वेळा उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणाऱ्या झेंड्याचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. आपण शिवभक्त आहात. शिवचरित्राचे जाणकार आहात. त्यामुळे आपण स्वतःहून आपल्या पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे असे मारूती भापकर यांनी म्हटले आहे.