पिंपरी (Pclive7.com):- गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘महाविकासआघाडी’ सरकारच्या ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ उद्यापासून राज्यभरात होणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील चार ठिकाणांची निवड केली आहे. महापालिका भवनाच्या आवारातील उपाहारगृह, वायसीएम हॉस्पिटल उपाहारगृह, वल्लभनगर एसटी स्टँड उपाहारगृह आणि पीसीएनटीडीएच्या आवारातील उपाहारगृहात शिवभोजन मिळणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, दिवसाला पाचशे व्यक्तींना सवलतीत भोजन मिळणार आहे. नागरिकांना दहा रुपयांत भोजन मिळणार असले. तरी, ते पुरविणाऱ्या संस्थेला राज्यसरकारकडून अनुदान मिळणार आहे. एका थाळीचा दर पन्नास रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान दिले जाईल.
पिंपरी चिंचवड शहरात या ठिकाणी मिळणार ‘शिवभोजन थाळी’
पिंपरी चिंचवड महापालिका भवनाच्या आवारातील उपाहारगृहात १०० थाळी
वायसीएम हॉस्पिटल उपाहारगृहात १५० थाळी
वल्लभनगर एसटी स्टॅंड उपाहारगृहात १५० थाळी
प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील उपाहारगृहात १०० थाळी
थाळी बद्दलची माहिती
दोन चपात्या (प्रत्येकी ३० ग्रॅम)
एक वाटी भाजी (१०० ग्रॅम)
एक मूठ भात (१५० ग्रॅम)
एक वाटी वरण (१०० ग्रॅम)
शिवभोजनाची वेळ :दुपारी १२ ते २
भोजनालयासाठी निकष :-
एकावेळी किमान २५ लोकांच्या जेवणासाठी पुरेशी जागा उपलब्ध हवी. शिळे किंवा खराब झालेले अन्न देऊ नये. स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सवलतीत जेवण देऊ नये.