पिंपरी (Pclive7.com):- शिरुर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज (दि.२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास (वायसीएम) भेट दिली. यावेळी त्यांनी रूग्णालयाचा कारभार, डॉक्टरांच्या अडचणी तसेच येथील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, दत्ता साने, शाम लांडे, देवीदास गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव उपस्थित होते.
रुग्णसेवेसाठी शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्य भारत योजनेचा सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा घेता यावा, यासाठी रुग्णालयामध्ये त्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करा, त्यासोबतच शासकीय योजनांचे टेबल रुग्णालयातील दर्शनीय भागात सुरू करावे अशा सूचना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून त्यांना येणाऱ्या समस्या समजावून घेतल्या. रुग्णालयातील रुग्णसेवेच्या तसेच कामकाजात काही बदलाच्या सूचना केल्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, वायसीएमच्या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. सादरीकरणामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती सांगण्यावर अधिकाऱ्यांचा भर होता. परंतु, रुग्णसेवा हे रुग्णालयाचे पहिले कर्तव्य आहे. बाहेरुन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी. या रूग्णालयाच्या कारभारावर माझी बारीक नजर असणार आहे. याबाबतीत जे चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. वायसीएम रुग्णालयाच्या पलिकडे जाऊन महापालिकेची आरोग्य सेवा आहे. भोसरीतील प्रस्तावित १०० बेडचे हॉस्पिटल तयार असूनही ते का सुरु होत नाही, त्याचा अहवाल मागविला आहे. वायसीएममध्ये होत असलेली उपकरण खरेदी आणि त्या उपकरण खरेदीच्या माध्यमातून नक्की ती उपकरणे सद्यस्थितीमध्ये सुरु आहेत का? एकूण उपकरणांची झालेली खरेदी, असलेली प्रस्तावित खरेदी आणि त्यानंतर त्याचा होणारा वापर याचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. काही उपकरणे २०१२ मध्ये घेतलेली आहेत. परंतु, अजुनपर्यंत त्याचा वापर झालेला नाही. पुन्हा दोन महिन्यानंतर आढावा घेतला जाईल. त्यानंतर यामध्ये काही सुधारणा केल्या आहेत का, त्याची पाहणी करणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेवटी बोलताना सांगितले.






















Join Our Whatsapp Group