पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या ११६० नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांनी किमान १४ दिवस तर गरज पडल्यास २८ दिवस घरातच थांबण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात. मात्र या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या १३ नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून आज नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
नागरिकांनी घरी, कामाच्या ठिकाणी अथवा वाहनामधील वातानुकुलीत यंत्रणेचा वापर टाळावा. तसेच शहरात कलम १४४ लागू झाले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व अस्थापना बंद ठेवण्यात येत असून अत्यंत आवश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे. जिवनावशक वस्तू यापुढे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्याचा अनावश्यक साठा करु नये असे आवाहन ही महापौर माई ढोरे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांनी आपल्या कुंटुंबीयासह आपल्या शरीराच्या तापमानाची तपासणी घरातच करावी व त्याची नोंद ठेवावी. महानगरपालिकेच्या तपासणी पथकाला माहिती देवून आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.२४ पर्यंत एकुण १३७ व्यक्तींचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ११२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
आज दि.२४ रोजी कोरोना (कोविड १९) या आजाराच्या एकुण पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच आज दि.२४ रोजी एकुण १० व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. आज दि.२४ अखेर शहरातील ४ लाख ०१ हजार ८०७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आज अखेर ११६० व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हून घरामध्येच (Home Quarantine) मध्ये रहावे व जे नागरिक घरामध्ये (Home Quarantine) राहणार नाहीत अशा नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच उपरोक्त नमूद देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group