पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन (HMIF) यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला ३०० एमएस ए-टाईप (ट्रॅफिक) बॅरिकेड्स भेट देण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून आणि ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनच्या इंडिया रोड सेफ्टी उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेची गरज लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली आहे.

हे बॅरिकेड्स शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे, विशेष वाहतूक नियोजन क्षेत्रे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होऊन अपघातांची शक्यता कमी करण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संग्राम आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) दत्तात्रय तेली, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विशाल गायकवाड तसेच ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




















Join Our Whatsapp Group