रावेत (Pclive7.com):- रावेत, किवळे, विकासनगर परिसरात गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने हजारो नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस आणि मावळ लोकसभा युवा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी रावेत येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

रावेत विकासनगर, किवळे, मुकाई चौक, चंद्रभागा कॉर्नर, संकेश्वर विला, आकाशराज, बीआरटी रोडलगतच्या सर्व सोसायट्या, पेंडसे कॉलनी, टी.सी. कॉलनी आदी भागांमध्ये वीजपुरवठा बंद असल्याने सुमारे पाच ते सहा हजार कुटुंबे प्रभावित झाली आहेत. वीज नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत ऐश्वर्या तरस व राजेंद्र तरस यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. “जोपर्यंत जबाबदार अधिकारी स्वतः येऊन परिस्थितीची जबाबदारी स्वीकारत नाहीत, ठोस आश्वासन देत नाहीत आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
“ही केवळ वीजपुरवठ्याची समस्या नसून हजारो नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. प्रशासनाने तातडीने जागे होऊन वीजपुरवठा सुरळीत करावा आणि नागरिकांना न्याय द्यावा,” अशी मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी असून, वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




















Join Our Whatsapp Group