पिंपरी (Pclive7.com):- शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौर लांडगे यांनी आज महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शहरातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणी साचणारी ठिकाणे, नाले, सबवे, पूरप्रवण भाग, धोकादायक झाडे, जीर्ण संरचना, रस्त्यांची स्थिती तसेच आपत्कालीन यंत्रणेची सज्जता याबाबत माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रात उपस्थित राहावे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. विशेषतः उघडे मॅनहोल, पाणी साचणारी ठिकाणे, धोकादायक झाडे, विद्युत धोक्याची ठिकाणे तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकणाऱ्या प्रत्येक बाबीवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापौरांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने केवळ तक्रारींची वाट न पाहता संभाव्य धोके ओळखून आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या जीवाशी संबंधित कोणतीही बाब अत्यंत गांभीर्याने हाताळावी आणि कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.
यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवश्यक नसल्यास पावसादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून अथवा उघड्या नाल्यांच्या परिसरातून जाणे टाळावे, विद्युत खांब, तुटलेल्या तारा किंवा धोकादायक झाडांच्या परिसरापासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा धोका निदर्शनास आल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष अथवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन केले.
याबाबत महापौर रवि लांडगे म्हणाले, “नागरिकांच्या जीवापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करावे, संभाव्य धोके वेळेत दूर करावेत आणि कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची शंभर टक्के दक्षता घ्यावी. सुरक्षित पिंपरी-चिंचवड हेच आपल्या सर्वांचे सामूहिक उत्तरदायित्व आहे.”




















Join Our Whatsapp Group