
पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला असून पुढील तीन तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सचेत ॲपवर आज (दि.४) दुपारी ४ वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसासह काही भागांत वादळी वाऱ्यांचाही प्रभाव जाणवू शकतो. नदी, नाले, ओढे आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला असून, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे सांगितले आहे. तसेच झाडे, होर्डिंग्ज किंवा जीर्ण इमारतींच्या परिसरात थांबणे टाळावे आणि स्थानिक प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची तीव्रता वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगून सुरक्षित राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.




















Join Our Whatsapp Group