पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत पावसाळ्याच्या काळात रस्ते व इतर ठिकाणी खोदकाम करण्यास सर्वसाधारणपणे बंदी असताना, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ३८ किलोमीटर खोदकामास विशेष परवानगी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

सुलभा उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी १५ मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे कोणत्याही प्रकारच्या खोदकामास परवानगी दिली जात नाही. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी तब्बल ३८ किलोमीटर खोदकामास विशेष परवानगी देण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी त्यांनी पुणे शहरात प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तसेच मुंबईतील अशाच अपघातांचा उल्लेख केला. पावसाळ्यात सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

“जर पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन आणि आयुक्त स्वीकारणार आहेत का? याबाबत माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका जाहीर करावी,” अशी मागणीही सुलभा उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामुळे पावसाळ्यात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कोणती खबरदारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group