पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांच्या संख्येत आज दोनने वाढ होऊन दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. पूर्वीचे एकूण १२ पैकी ११ रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्ता पर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकुण १४ रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळून आलेले आहेत. तर ‘होम क्वारंटाईन’ नागरिकांची संख्या १५८० झालेची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील उद्रेकाच्या अनुषंगाने तबलीग जमातीच्या बंगलेवाली मशिद, नवी दिल्ली या ठिकाणी धार्मीक कार्यक्रमांत सहभागी झालेल्या नागरीकांमधील २३ संशयीत व ५ नातेवाईक असे २८ संशयीत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २ संशयीतांचे स्वॅब ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. उर्वरित २६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत अशी माहिती महापौर यांनी दिली. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या १५८० असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या ‘होम क्वारंटाईन’ मधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group